Thursday, June 14, 2007

सोम्यागोम्या

सोम्यागोम्याच्या गल्लीतल्या कट्ट्यावर
रोजच तात्विकतेच्या चर्चा चालतात
कसली आलीये तात्विकता ?
इथे तर टॉम, डीक आणि हॅरी माज करतात...

लोकं माजोर्डे म्हणून सोम्यागोम्या
दोन पेगात टल्ली होतात
वेटरला टीप द्यायची की नाही
यावर नेहेमीच वाद घालतात...

सोम्यागोम्या रोजच मोठ्याने वाद घालतात
कोणी भांडायला आलं की शेपूट घालून पळतात
सापडतात मग गल्लीतल्या एखाद्या कोपर्यात
दबक्या आवाजात सार्या सिस्टीमचा निषेध करतात...

चार लोकां विषयी मत्सर वाटतो
म्हणून ते गर्दीतही एकटे दुकटेच असतात
चेहेर्यावरले मुखवटे हटू नये म्हणून
ह. भ. प. पेक्षाही भारी बंधूत्वाच्या गप्पा हाणतात

सोम्यागोम्या सतत चोकटी मोडायचा विचार करतात
स्वार्थानुसार क्षणोक्षणी नैतीकतेच्या व्याख्या बदलतात
कोणास ठावूक, का? सोम्यागोम्या फक्त
चौकटीच्याही आतल्या एका वर्तूळातच जगतात

सोम्यागोम्या खूप हळवे असतात
माणसं गेल्यावरच त्यांना त्यांच्या किमती कळतात
स्वतःची किंमत मात्र भलतीच चढवून सांगतात
अन् उधारीच्या तत्वज्ञानावर शेवट पर्यंत जगतात...

सोम्यागोम्या हजारो जन्म घेवूनही अजरामर असतात...

Monday, May 28, 2007

प्रवास

बंद डोळे स्तब्ध श्वास
धडधडणार्या छातीचा नाजूक प्रवास!
सरळ रस्ता वळणं फार
नाती थोडी माणसं चिक्कार!
नाही भूक नाही तहान
प्रवासाची गती किती महान!
हा की तो, तो की ती
कोणाचा कोणाशी कसलाच संबंध नाही!
बडबड-गोंधळ धावपळ फार
प्रत्येकाचा मात्र अबोल प्रवास!
भूत-भविष्याचा साखळदंड कमकूवत फार
धडधडत्या छातीचा संपला की प्रवास!

Friday, April 13, 2007

समाधी

श्वासही नकोसे वाटतात
कसलेच आभास जाणवत नाहीत
दुरवर कुठे लख्ख प्रकाशही नाही
अन् स्वतःला चाचपडायला काळोख देखील नाही...
कुणाचा आधार घ्यायला हात समोर येत नाहीत
अन् हात आले तर पांगळेपण जाणवत नाही...
मी फक्त चालतो वाटेविना वाळवंटात...
देव - देव करत दगडालाच साकडे घालतो,
विचारतो त्याला - मी कशासाठी जगतो?
तेव्हा एक तांबडा तारा मंद हसतो
मी चिडतो, रुसतो, धुसफुसतो.
ग्लानी येत, वेळ जातो कळत नाही.
एक हलकीच थाप पाठीवर येते
मागे वळून बघतो वार्याची झुळूक असते ...
मी सुखावतो, तांबडा तारा मिष्कील हसतो
डोळ्यातला एक थेंब हातात घेवून
मी धावत सुटतो क्षितीजा पर्यंत...
स्वप्न बघतो - तो थेंब सागराला व्यापतो
तांबडा तरा खदखदून हसतो
मी डोळे फाडून-फाडून बघतो
क्षितीज नसतच का कुठे?
मी हबकतो, क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
माझ्याच पाऊलखुणांची दुरवर वाट झालेली दिसते
अन् एक लोंढा त्या वाटेनं सावकाश येतांना दिसतो
तांबडा तारा माथ्यावर स्तब्ध होतो
मी माझ्याच सावलीला पारखा होतो
मी धावत सुटतो वाट नसलेल्या वाळवंटात
लोंढा मला घेरतो, मी निष्प्राण होतो
माझ्या पाउल खुणांचा मात्र महामार्ग होतो
यथावकाश मी ही वाळवंटातलाच एक कण होतो
येणारा जाणारा प्रत्येक लोंढा
माझ्या मातीतल्या कणाला समाधी म्हणतो

तांबडा तारा आता निर्विकार हसतो...

Friday, April 06, 2007

कोकीळा

पानं झडलेल्या फांद्यांवर बसून
तळपत्या सुर्याला झिडकारते...
खरं सांग, कोकीळे तू का गाते?

आंब्याच्या मोहराला तू साद घालते
त्याची अविट गोडी मात्र नाकारते
खरं सांग, कोकीळे तू का गाते?

पोटच्या पिलांना दुसर्याच्या घरट्यात वाढवते
स्वतःच्या खोपट्याविना तू जगते
खरं सांग, कोकीळे तू का गाते?

Friday, March 30, 2007

माझीया मनी

तूझ्या आठवणीत
सहज उमलती शब्दकळ्या
माझीया मनी गुणगुणल्या
रंगवेड्या पाकोळ्या

तूझ्या आठवणीत
नील आभाळही बरसला
माझीया मनी थयथयला
मोरपंखी पिसारा

तूझ्या आठवणीत
चैत्रही शहारला
माझीया मनी सजला
तूझ्या स्पर्षातला गारवा
-- तूझा प्रवर्तक

Sunday, March 25, 2007

नीशाचर

अनूभवू दे ही रात्र थोडी
आभाळमाय ही कोवढी
चंद्राची घनघोर सावली
चांदण्यांच्या मैफीलीत रंगली
धुंद चढली ही सुगंधी माती

अनूभवू दे ही रात्र थोडी
मिट्ट काळोखी गर्द झाडी
सुसाट वारा सनसनाटी
मनालाही मग स्फुर्ती चढली
मंद नयनी निद्रा हरपली

अनूभवू दे ही रात्र थोडी
आज नाचू दे मज स्वच्छंदी
का, उगाच मी हा हर्ष मानसी?
वेड्या वेळ आहे, काळ नाही
फिरव तू कुंचला शब्दांवरी

अनूभवून घे ही रात्र सारी
येईल दिवस रोजच्या प्रहारी
नसतील येथे फक्त तुझेच ठोके
असेल तीच वर्दळ भारी
अनूभवू दे ही रात्र थोडी...

क्षण

अधूरे क्षण, विसरणारी लोकं
जुळणारी - तुटणारी मनं
हसरे - रडवे ओठ
ओले - सुके बोलके डोळे
तरीही अविरत श्वास
आठवणीच शेवटी
अन् रिक्त क्षण...

पून्हा आठवणीच
पंखीया वसले, हळूच सरले
आभाळी भर्रकन भिडले
मन माझीया चिंब झाले
थर-थरवे ओठ घट्ट दबले
नयनी दोन दव डागले
अन् गपकन मिट्ट मिटले
श्वास गच्च रोखले
क्षणात क्षण जिवंत झाले

श्वास वेगानं फुत्कारले
डोळे पापणीतून चकाकले
ओठ मुक्त हसले
मनच ते कसले?
क्षणात मातीस भिडले
क्षणास क्षण क्षणिक उरले...

झुला

कोणीतरी कधीतरी
मला जवळ करतं
करू दे...
मला सहज टाळतं
टाळू दे...

कोणीतरी कधीतरी
माझ्यावर मनस्वी हसतं
हसू दे...
माझ्यासाठी मुसमुसून रडतं
रडू दे...

कोणीतरी कधीतरी
माझ्यावर खुप रुसतं
रूसू दे...
माझे भरपूर लाड करतं
लाडवू दे...

कोणीतरी कधीतरी बरच काही करत असतं
कधीतरी कोणीतरी मी ही असतो
भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतो
हेच का आपण जगणं जगत असतो?
जगू दे...............

Sunday, March 18, 2007

निद्रा

निद्रा

माझी अस्वस्थता

पोटातून बाहेर पडते.

नाकाला झोंबते,

डोक्याला झिंझीण्या येतात.

पापण्या घट्ट मिटतात

अंधारात काहीतरी चाचपडतात

ओठ विलग होत सुकतात

जिभेखाली लाळेचे बुडबुडे फूटतात

अन् एक मोठा ऊसासा...

मी आठवतो काहीतरी आठवण्याचा

अडकत जातो दोन भूवयांमध्ये

डोकं दुखतं, डोळ्यांमध्ये ग्लानी येते

पुन्हा एक उसासा...

डोळे ताणून बघतो प्रकाशाकडे

उगाच गाल ओढले जातात

दात ओठांवर टेकतात

हा कसला अकारण आनंद?

आता उसासा नाही, हुंदका असतो.

हलकेच पाय पसरतात

मन रमत जातं भूत-भविष्यात

वर्तमान दिसतच नाही कुठे...

आपण जगतो ते वास्तव

की जे त्या क्षणाला

जगत नही ते वास्तव?

मनात सतत द्वंद्व विचारांचं

त्यातून एक मार्ग पक्का,

मग योग्य अयोग्यतेच्या

टिका टिपण्णी का?

अन् शेवटी शांत झोप.

सोमवार, 26 फेब्रुवारी 2007

नाशिक.

एक माणूस

एक माणूस

रणरणतं उन, तापलेली जमीन

तो नागव्या पायांनी नाचतो...

धो-धो पाऊस, गुढगाभर चिखल

तो मदमस्त लोळत असतो...


बोचरी थंडी, सोसाट्याचा वारा

त्याचा सदरा फडफडत असतो...

तो फक्त मिष्कील हसतो

तो मोठ मोठ्यानं रडतो...

तो खूप बोलत सोटतो

तो सहजच निशब्द होतो...

तो स्व भावनांशी खेळतो

तो नकळत भावनाविवष होतो...


त्याच्या झोपडीला छत नसतं,

त्याच्या घराला दार नसतं.

त्याच्या बायकोला ब्लाऊज नसतं,

त्याला झोपायला पांघरूण नसतं.

त्याच्या चूलीत सरपण नसतं,

तरीही त्याचा संसार असतो.


तो भीक मागत नाही,

द्याल ते घेत नाही.

कोणी हसल्यावर रूसत नाही,

कोणी रूसल्यावर हसत नाही.

तो काहीच करत नाही, का?

उत्तर कधीच सापडत नाही.


एका रात्रीत नाहीसा होतो

मोडक्या संसाराच्या खुणा ठेवून

उकीरड्या वरचा कूत्रा सुंगतो

शेपूट हलवत पिसाळल्यागत भूंकतो

डोळे नकळत शोधतात त्याला

तूम्ही बघीतलं का त्याला?

मंगळवार, 20 फेब्रुवारी 2007