Sunday, February 05, 2006

Best Friend

हो मी तूझ्या पासून लांब जाईन,

पण तू इतक्या सहज जाणार नाहीस.

मला ठावूक आहे तूला त्रास होईल.

काही दिवसात तूझं लग्न ठरेल,

तूला माझी खूप आठवण येईल.

दिवसातून सात वेळेस फोन जवळ जाशील

पण नंबर पुर्ण डायल होण्या आधिच फोन ठेवशील.

मग स्वतःला एकटं कोंडून रडशील.

अगदीच ढसा-ढसा नाही

फक्त दोन थेंब ओघळतील

तेव्हा मी,

माझ्या आफीसच्या जवळच्या टपरीवर

सीगारेटच्या लंब्या कश सोबत

तूझ्या आठवणींमध्ये जळत असेल.

कदाचित परवा डिव्हार्सची केस घेवून आलेली

टंच क्लायंट बघून सिगारेट फेकेनही.

अनेक दिवस-रात्र घडाळ्याच्या

काट्यांसमवेत मागे सरतील

पण आठवणींचा कल्लोळ वाढत जाईल.

मग कुठेतरी माझी चौकशी करशील.

एक दिवस, मी घरात नाहीये हे बघून

लग्नाचं आमंत्रण देशील.

माझ्यासाठी निरोप सोडशील

आवर्जून उपस्थित रहाण्याचा.

संध्याकाळी मी थकून घरी जाईन

तेव्हा आई आनंदाची बातमी म्हणून

तूझ्या लग्नाची पत्रिका हाती देईल.

क्षणात माझं पुर्ण अवसान गळालेलं असेल

पण मी स्वतःला आवरेल सावरेल

मग आरशात उगाचच स्वतःला चाचपडत बसेन.

तेव्हा कदाचित तू गुंग अशील

तुझ्या होणार्या नवर्याच्या विचारात

चुकून तूला परत माझी आठवण येईल

माझ्या फोनची तू आतूरतेने वाट बघशील

पण माझा फोन येणार नाही.

परत एकदा,

तू अपोआप स्वप्नरंजनात गुंग होशील

आणि अगदी अल्हादपणे झोपी जाशील

तेव्हा मी,

बार मध्ये कोपर्यात एकटा बसून

मख्खपणे पेग रिचवत असेन.

मग तूझा लग्नाचा दिवस उजाडेल,

कोणी तरी तूला विचारेल

का गं तो (मी) कुठे दिसत नाही

तूझ्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहील

पण तू स्वतःला कंट्रोल करशील.

अगदी अंतरपाटावर उभं राही पर्य़ंत

तीन-तीन वेळेस मी आलोय की नाही

याची खात्री करून घेशील.

थोडसं वाईट वाटेल पण थोडं सुखावशीलही

तेव्हा मी,

शांतपणे माझ्या कामात मग्न असेन.

रात्री मित्रांबरोबर गप्पा मारतांना

अचानक तूझ्या लग्नाची आठवण होईल

भावनात्मक होवून डोळ्यात पाणी आणायचा

मी सखोल प्रयत्न करेन

पण डोळ्यातून टिचभरही पाणी येमार नाही.

आसू मनातल्या मनातच झिरपतील

मग स्मित हास्य करत, चादण्यांकडे बघत

मी देवाकडे प्रार्थना करेन की,

तू कायम आनंदी रहावीस.

तेव्हा तू,

त्याच्या सोबत श्रूंगार करत असशील.

त्याच्या होणार्य़ा प्रत्येक स्पर्शाने

मी पुन्हा एकदा तीळ-तीळ तुटत असेन

मग काय¿ आपलं तेच डेली रुटीन...

काही दिवस जातील महीने जातील..

मधूनच तूला माझी आठवण येईल

कदाचीत आम्हा दोघांची

मनातल्या मनात तुलनाही करशील.

पण हे मात्र खरं

तूझ्या मनात मी व्यापलेलं सामराज्य

अगदी अलगद झिजत जाईल.

हळूहळू संसारात रमलीस की,

माझ्या आठवणी धुसर अस्पष्ट होतील.

तेव्हा मी,

रूंद झालेल्या कपाळावर हात फिरवत

एका काफी शॅप मध्ये बसलेलो असेन.

तीच आठवण, तीच सीगारेट, तेच जळणं,

मग सहजच बाजूच्या टेबलवर लक्ष जाईल,

तो तीला फूल एक्साईटमेंटमध्ये प्रपोज टाकेल

आणि ती त्याची समजूत घालेल

तू माझा फक्त मित्र आहेस, अगदी जवळचा,

Best Friend

मग या जगाच्या डेली रूटीनच्या गदीर्त

त्यांची मैत्री सुद्धा अगदी सहज विरून जाईल

हो ना ?

तूझा

Best Friend

प्रवर्तक पाठक