Friday, April 13, 2007

समाधी

श्वासही नकोसे वाटतात
कसलेच आभास जाणवत नाहीत
दुरवर कुठे लख्ख प्रकाशही नाही
अन् स्वतःला चाचपडायला काळोख देखील नाही...
कुणाचा आधार घ्यायला हात समोर येत नाहीत
अन् हात आले तर पांगळेपण जाणवत नाही...
मी फक्त चालतो वाटेविना वाळवंटात...
देव - देव करत दगडालाच साकडे घालतो,
विचारतो त्याला - मी कशासाठी जगतो?
तेव्हा एक तांबडा तारा मंद हसतो
मी चिडतो, रुसतो, धुसफुसतो.
ग्लानी येत, वेळ जातो कळत नाही.
एक हलकीच थाप पाठीवर येते
मागे वळून बघतो वार्याची झुळूक असते ...
मी सुखावतो, तांबडा तारा मिष्कील हसतो
डोळ्यातला एक थेंब हातात घेवून
मी धावत सुटतो क्षितीजा पर्यंत...
स्वप्न बघतो - तो थेंब सागराला व्यापतो
तांबडा तरा खदखदून हसतो
मी डोळे फाडून-फाडून बघतो
क्षितीज नसतच का कुठे?
मी हबकतो, क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
माझ्याच पाऊलखुणांची दुरवर वाट झालेली दिसते
अन् एक लोंढा त्या वाटेनं सावकाश येतांना दिसतो
तांबडा तारा माथ्यावर स्तब्ध होतो
मी माझ्याच सावलीला पारखा होतो
मी धावत सुटतो वाट नसलेल्या वाळवंटात
लोंढा मला घेरतो, मी निष्प्राण होतो
माझ्या पाउल खुणांचा मात्र महामार्ग होतो
यथावकाश मी ही वाळवंटातलाच एक कण होतो
येणारा जाणारा प्रत्येक लोंढा
माझ्या मातीतल्या कणाला समाधी म्हणतो

तांबडा तारा आता निर्विकार हसतो...

3 comments:

Anonymous said...

sahiiiiiiii

Anonymous said...

U r ammmmaaaazzziing!
Lovely poems...!
Just Keep it up........!

aash.. said...

good one