Friday, November 25, 2011

ऊन - पाऊस


तीच्या विस्कटलेल्या केसातून हात फिरवावा
अन् आभाळाने चमचमती साद घालावी
लख्ख प्रकाशात तिचा चेहरा चमकावा

मातीचा मृदूगंध श्वासा-श्वासात ठसावा
थेंब थेंब पावसाने मनं चिंब भिजावी
भिजलेल्या स्पर्षाचा जागर रोमरोम उठावा

उन्हाच्या शालीत उबदार स्पर्ष बंधित व्हावा
मौनात तीच्या माझी कविता असावी
अस्फूट शब्दातला अर्थ चराचरात वसावा...

Friday, September 02, 2011

कोहम्


चैत्रातला जागर मी
वैशाखातला विखार मी
बोलणारा वसंत मी
जगणारा श्रावण मी

ऋतूंचे चक्र मी
सागरातला थेंब मी
तार्याभोवतालचे आभाळ मी
पृथ्वीचा गर्भ मी

कल्लोळातला सूर मी
नजरेतला क्षितीज मी
मधातला गंध मी
शब्दातला अर्थ मी

तूझ्यातला तू मी
माझ्यातला तू मी
संभोगातला स्पर्ष मी
समाधीतला मृत्यू मी

गर्भातली भूक मी
डोळ्यातला थेंब मी
हसण्यातला आनंद मी
चराचरात मीच मी

Wednesday, July 13, 2011

मन

खळखलणार्या झर्यासारखं
मन माझं खळखळलं
आठवणींचा धबधबा होवून
मन चिंब-चिंब भिजलं...

शहारलेल्या जमीनीच्या कुशित
मन माझं शहारलं
शब्दांच्या डोलार्यात डुलून
मन हिरवं गच्च झालं

सैरावैरा धावणार्या वार्यापरी
मन सैरभैर झालं
सोबत तूझी मिळता क्षणी
मन मनात मिळालं

Friday, March 11, 2011

आव्हान


पेटलेला गर्भ माझा
ज्वाळा मुखात आहे
सुर्याला जिंकण्याची आस
मनी धगधगते आहे..

उसळते रग रक्तातली
खळबळ हृदयात आहे
आभाळ कवेत घेण्यास
हात सरसावले आहे...

क्षितीजावरी नजर माझी
विश्वापल्याड दृष्टी आहे
वादळे रोखली किती
आव्हान तूम्हास आहे...

Sunday, February 27, 2011

माझी मराठी


माझीया मराठीत
वसे सूर्याचा अंश
अंधारल्या जगाला
दावीला प्रकाश..

अमृतली मराठी
ज्ञानोबा माउलींनी
लखलखली मराठी
कविवर्य कुसूमाग्रजांनी

तुकोबांनी दिला
जगण्याचा सार
फंदींचे फटके
तलवारीला धार

जग जिंकलीपरी
गर्व ना मनाशी
माझी ही मराठी
जनांच्या ह्रदयाशी...

-प्रवर्तक पाठक.

मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...