Wednesday, September 27, 2006

कुढणं

पडद्या मागे जावून त्याने
गालावरचा खारट ओघळ पुसला
हसत हसत पुढे आला
म्हणाला – काय, कसा आहेस?
त्याच्या डोळ्यावर खळी होती
त्याचे निस्तेज डोळे पाणवटलेले
मी त्याच्याकडे पाहून दिलखूलास हसलो
त्याचे डोळे चकाकले अन् हसले
पण खारट ओघळ पुन्हा एकदा ओघळले
कसा बसा कंठ आवरत तो बोलला –
कसा आहेस? का हसतोयस?
मी शांतपणे सांगितलं – तू गांडूयेस्
तो एखाद्या कर्मठ माणसा सारखा
अश्लील अश्लील करत सटकला...
माणूस नेहेमी मनमोकळा का रहात नाही?
-- प्रवर्तक पाठक

माझी कातरवेळ

माझी कातरवेळ नेहेमीच उदासवाणी असते
कारण तीची सावली दूर दूर पर्यंत नसते
क्षणभर वाटतं ती असावी
क्षणभर वाटतं ती नसावी
पण ती, कधीच नसते...

दिवेलागणीच्या वेळेस वातावरणात प्रसन्नता असते
मनातली विलक्षण सुन्नता हेलकावत असते
क्षणभर वाटतं ती येईल
क्षणभर वाटतं ती येणार नाही
पण नजर मात्र उंबरठ्यावरच खिळते...

गाढ झोप लागल्यावर ती स्वप्नपरी असते
अगदीच कुरूप नसली तरी सुंदर दिसते
क्षणभर वाटतं हेच स्वप्न
क्षणभर वाटतं हेच वास्तव
पण माझी प्राणप्रीय साखरझोप मात्र मोडते...

रोज टरवतो आज पासून नविन सुरवात
त्याच क्षणाला तिची छबी नजरे लमोर असते
क्षणभर वाटतं हा माझा कमकुवत पणा
क्षणभर वाटतं हीच जगण्यातली मजा
पण...

एक दिवस दारावरची बेल वाजते
तिच्या जागी दुसरीच असते
क्षणभर वाटतं आता चिरकाल प्रसन्नता
क्षणभर वाटतं ही परी नाही जणू अप्सराच
पण ती ही जागेपणी स्वप्न दाखवून निघून जाते

तुम्हाला खरं सांगतो ...
माझी कातरवेळ नेहेमीच उदासवाणी असते...
-- प्रवर्तक पाठक

आठवणी कधी...

आठवणी कधी...
चिंब होवून हसतात
कधी चिंब होवून रडतात...

आठवणी कधी...
अल्हाददायक असतात
कधी बोचर्या,
तर कधी नुसत्याच आठवणी असतात...

आठवणी कधी...
प्रेमाच्या असतात
मैत्रीच्या, कधी द्वेशाच्या
तर कधी फक्त नात्यांच्या असतात...

आठवणी कधी...
अफाट आभाळाच्या असतात
आकाशातल्या निवडक रंगछटांच्या
तर कधी न संपणार्या आकाशा येवढ्या असतात...

आठवणी कधी...
सळसळणार्या झर्याच्या असतात
उथळ वहाणार्या नदीच्या
कधी संथ सरोवराच्या निळशार रंगाच्या
तर कधी महासागराच्या खोली एवढ्या असतात...

आठवणी कधी...
वार्यासारख्या बेभान होतात
कधी पर्वतासारख्या निश्चल
तर कधी सुकलेल्या पानासारख्या नुसत्याच झुरतात...

आठवणी फक्त आठवणीच असतात...
सुख दुखाच्या हिंदळ्यावर नेहेमीच झुलवतात
अवती भवती फक्त आभास निर्माण करतात
आणि आपला वर्तमान हिसकावून नेतात...

आठवणी कधी...
-- प्रवर्तक पाठक

वासना

तूझ्या नयनी अथांग सागर
त्यात जाहलो मी थेंब खुळा
तूझ्या मिठीतून वाहे कृष्ण विवर
त्यात जाहलो मी शून्य खरा...

तूझा स्पर्ष परीसाहून सुंदर
सुवर्णही भासे क्षूद्र मला
तूझ्या श्वासात जाणवे वादळी वारा
खळखळतो अंतरी होवूनी मुक्त झरा...

तूझ्या ओठी मंथली अमृतधारा
प्राशूनी होई निळकंठही बरा
काय सांगू तापली ही मातीतली काया
शीतल होई मम् आत्म सारा...
-- प्रवर्तक पाठक

प्रवर्तन

पहीलीच्या पहील्याच दिवशी,
शाळेत मास्तरनं विचारलं –
'तुझी जात काय? '
मी म्हंटलं, 'ठावूक नाही... '

घरी पोहचताच पाठीवरचं ओझं उतरवलं
बापाच्या नजरेत नजर रोखून विचारलं –
'माझी जात काय? '
बापाने कानाखाली ओढली,
'भडव्या तूला जात कोणी शिकवली? '
मी आईला विचारलं –
'जात म्हणजे काय गं? '
कसलातरी संदर्भ देत उद्गारली –
जी जात नाही ती 'जात'
फारसं नाही काही कळलं...

एकदा वसीमच्या घरी गेलो
त्याच्या बहिणीनं पाण्याचा ग्लास दिला
मला नव्हतं प्यायचं मी नाही प्यायलो
त्याच्या बापानी नाव विचारलं
मी खणखणीत आवाजात
माझा पूर्ण परीचय दिला.
वसीम एकच वाक्य बोलला –
'वो हिंदू है. '
मी खरच सांगतो,
तेव्हा मला तहान नव्हती लागली.

एकदा मी मशिदित गेलो,
कोणीच नाही अडवलं.
एकदा मी चर्चमध्ये गोलो
Come To Me म्हणत माझं स्वागत झालं.
एकदा मी मंदीरात गेलो
गुरूजींनी सोहळं जपत छान प्रसाद दिला
देवा शप्पथ, मला प्रत्येक ठिकाणी प्रसन्न वाटलं...

त्या दिवशी मी आजीला विचारलं
'आपला धर्म कोणता? '
आजोबांनी हाक मारून मांडीवर बसवलं
म्हंटले, 'माणूसकी होच खरा धर्म. '

एकदा शाळेतून येतांना रस्त्यात दंगल पेटली
दंगलखोरांची दहशत, होणारी जाळपोळ
क्षणभरासाठी मला सगळीच गंमत वाटली...
कोणीतरी जवळ आलं,
दरडावत काही बाही विचारलं...
माझं शिष्न बघून मला सोडलं
अन् वसीमला कापलं...
मी सुन्नपणे बघत राहीलो...
कोण्या एका माणसाने गाडीत टाकून घरी सोडलं
आईच्या कवेत खुप शांत वाटलं
तरी सुद्धा मी खुप – खुप रडलो.
तीला विचारलं 'हे काय चाललंय? '
तीचे थरथरणारे ओठ पुटपुटले
- काहीच नाही...

आता खुप काही आठवत नाही,
फारसं काही कळत नाही,
अजूनही काही उमजत नाही.
पण काकड आरतीचा ढोल, चर्चची बेल
आता खुपच कर्ण कर्कश्य वाटतेय
अन् अल्लाची बांग आक्रोष करतेय...
कधी कधी वाटतं,
लेण्यांमधल्या त्या स्तब्ध बुद्धाच्याही अंगात येते काय?
जाऊ द्या हो येथे कोणाला कोणाचे काय?

आता मी माझी जात कधीच सोडत नाही.
दुसरा कोणताही धर्म जाणून घेत नाही.
निवडक रक्ताची नाती सोडली तर ...
मी, कोणाला आपलं म्हणत नाही.
माणूसकीचा अर्थ जाणायचा मी प्रयत्न देखील करत नाही..
मला इथे काहीच बदलायचं नाही..
कुठलंही परीवर्तन आणायचं नाही..
मला फक्त जगायचं आहे,
पण मरण्यापूर्वी एक दिवस माणूस व्हायचं आहे...
-- प्रवर्तक पाठक

योद्धा

चुकलेल्या वाटा
खिदळणारे घोडे
खवळलेला समूद्र
हेलकांडणारी नाव
अरे हट्, मी नाही भिणार...

सप् सप् कापणार्या तलवारी
झप् झप् चालणारे सैनिक
ठो ठो करणार्या बंदूका
धप धप पडणारे तोफगोळे
अरे हट्, मी नाही डगमगणार

कोण म्हणतं वाट चुकली?
मी चालेन ती वाट ठरणार
मी बोलेन तो शब्द होणार
मी सांगेन तो अर्थ असणार
असलो मी मावळा जरी
अरे हट्, साम्राज्य मी उभं करणार

मी लढत जाईन अखेरच्या श्वासा पर्यंत
खांडोळ्या करीन अन्याय संपे पर्यंत
नांगरेन जमीन मी स्वार्थाची
बीजं रोवेन त्यात त्यागाची
खचलात तूम्ही कोणी जरी
अरे हट्, आधार मिळेल आपल्या खांद्यावरी...
-- प्रवर्तक पाठक

मनःशांती

डोळे मिटून शांतपणे आत बघतो,
तेव्हा काळवटलेला अंधार असतो.
वाटतं विचार करावा खोलवर,
पण विचारच येत नाहीत...
वाटतं निर्विचार व्हावं
पण विचार थांबत नाहीत...
जगातल्या सगळ्या निरर्थक गोष्टी
त्याच क्षणाला मनात येतात,
मनच सालं ते तिथेही द्वंद्व सोडत नाही...

कृष्णाच्या गितेतला फक्त व्यवहार कळतो
पण मर्म कधी उमजतच नाही.
ओशोंच्या तत्वज्ञानातला संभोगच तेवढा पटतो
समाधी अवस्थेत जायचा मार्ग मात्र सापडत नाही
त्या बुद्धाला तरी कसं जमलं
यावर बुद्धी कधीच चालत नाही.

म्हणून आम्ही ठरवतो उघड्या डोळ्यांनी जगावं
आणि अलगदपणे डोळे उघडतो
तेव्हा माणसा-माणसात पेटलेला
स्वार्थी वणवा बघवत नाही
त्यात आम्हीही जळत जातो...
पण त्याचं भस्म मात्र कधीच होत नाही...
डोळ्यांवर पट्टी बांधून जगण्याची
गांधारी इतकी कुवत नाही
पठाणांसारखं लढायला
बंदूक उचलायची ताकद नाही...
वाटतं आत्महत्या करावी
पण इतकेही भेकड आमचे संस्कार नाहीत...


वेदांच्या पठणा इतकच आमचं पांडीत्य नाही
नविन उपनिषदं लिहिणारे
ऋषीमूनी अजूनही आमच्यातूनही गेले नाहीत
बोथट झालेल्या धारा
तिक्ष्ण करण्याचीच तेवढी गरज आहे
सुर्यालाही डोळे मिटायला लावेल
इतका आमच्या अंतरंगात प्रकाश आहे...

डोळे मिटून बघू ...
तेव्हा धगधगणार्या ज्वाला दिसतील
तेव्हा आमचे विचार सखोल असतील...
श्वासाच्या प्रत्येक समिधेत आमची समाधी असेल
तीच निर्विचार निराकार मनःशांती असेल
तेव्हा आमच्यातला प्रत्येक माणूस
विश्वाचा सार्थी असेल
तर कधी मुक्तीचा मार्ग दाखवणारा बुद्ध असेल
पण मनच सालं ते तिथेही द्वंद्व सोडत नाही...

-- प्रवर्तक पाठक