Wednesday, September 27, 2006

प्रवर्तन

पहीलीच्या पहील्याच दिवशी,
शाळेत मास्तरनं विचारलं –
'तुझी जात काय? '
मी म्हंटलं, 'ठावूक नाही... '

घरी पोहचताच पाठीवरचं ओझं उतरवलं
बापाच्या नजरेत नजर रोखून विचारलं –
'माझी जात काय? '
बापाने कानाखाली ओढली,
'भडव्या तूला जात कोणी शिकवली? '
मी आईला विचारलं –
'जात म्हणजे काय गं? '
कसलातरी संदर्भ देत उद्गारली –
जी जात नाही ती 'जात'
फारसं नाही काही कळलं...

एकदा वसीमच्या घरी गेलो
त्याच्या बहिणीनं पाण्याचा ग्लास दिला
मला नव्हतं प्यायचं मी नाही प्यायलो
त्याच्या बापानी नाव विचारलं
मी खणखणीत आवाजात
माझा पूर्ण परीचय दिला.
वसीम एकच वाक्य बोलला –
'वो हिंदू है. '
मी खरच सांगतो,
तेव्हा मला तहान नव्हती लागली.

एकदा मी मशिदित गेलो,
कोणीच नाही अडवलं.
एकदा मी चर्चमध्ये गोलो
Come To Me म्हणत माझं स्वागत झालं.
एकदा मी मंदीरात गेलो
गुरूजींनी सोहळं जपत छान प्रसाद दिला
देवा शप्पथ, मला प्रत्येक ठिकाणी प्रसन्न वाटलं...

त्या दिवशी मी आजीला विचारलं
'आपला धर्म कोणता? '
आजोबांनी हाक मारून मांडीवर बसवलं
म्हंटले, 'माणूसकी होच खरा धर्म. '

एकदा शाळेतून येतांना रस्त्यात दंगल पेटली
दंगलखोरांची दहशत, होणारी जाळपोळ
क्षणभरासाठी मला सगळीच गंमत वाटली...
कोणीतरी जवळ आलं,
दरडावत काही बाही विचारलं...
माझं शिष्न बघून मला सोडलं
अन् वसीमला कापलं...
मी सुन्नपणे बघत राहीलो...
कोण्या एका माणसाने गाडीत टाकून घरी सोडलं
आईच्या कवेत खुप शांत वाटलं
तरी सुद्धा मी खुप – खुप रडलो.
तीला विचारलं 'हे काय चाललंय? '
तीचे थरथरणारे ओठ पुटपुटले
- काहीच नाही...

आता खुप काही आठवत नाही,
फारसं काही कळत नाही,
अजूनही काही उमजत नाही.
पण काकड आरतीचा ढोल, चर्चची बेल
आता खुपच कर्ण कर्कश्य वाटतेय
अन् अल्लाची बांग आक्रोष करतेय...
कधी कधी वाटतं,
लेण्यांमधल्या त्या स्तब्ध बुद्धाच्याही अंगात येते काय?
जाऊ द्या हो येथे कोणाला कोणाचे काय?

आता मी माझी जात कधीच सोडत नाही.
दुसरा कोणताही धर्म जाणून घेत नाही.
निवडक रक्ताची नाती सोडली तर ...
मी, कोणाला आपलं म्हणत नाही.
माणूसकीचा अर्थ जाणायचा मी प्रयत्न देखील करत नाही..
मला इथे काहीच बदलायचं नाही..
कुठलंही परीवर्तन आणायचं नाही..
मला फक्त जगायचं आहे,
पण मरण्यापूर्वी एक दिवस माणूस व्हायचं आहे...
-- प्रवर्तक पाठक

4 comments:

Anonymous said...

माणुस होउन काय करणार...असपासच वातावरण बदल्याणाची नुसती ईच्छाच कामाची नाही..एकाच हे काम नाही..एकास एक मीळवत माणुसकी वाढवावी..तर त्या कामात माणुस म्हणुन जगण्याला एका दिवस ही - आनंद!

Anagha Pathak said...

ही कविता एकदा तुझ्या कडून ऐकली होती college मध्ये..
आज परत वाचली.. तेव्हा ही कळाले नव्हते काय प्रतिक्रिया द्यावी ..
आज ही तो संभ्रम कायम आहे..

Dr.Jayesh Pathak said...

मस्तच

Dr.Jayesh Pathak said...

मस्तच