डोळे मिटून शांतपणे आत बघतो,
तेव्हा काळवटलेला अंधार असतो.
वाटतं विचार करावा खोलवर,
पण विचारच येत नाहीत...
वाटतं निर्विचार व्हावं
पण विचार थांबत नाहीत...
जगातल्या सगळ्या निरर्थक गोष्टी
त्याच क्षणाला मनात येतात,
मनच सालं ते तिथेही द्वंद्व सोडत नाही...
कृष्णाच्या गितेतला फक्त व्यवहार कळतो
पण मर्म कधी उमजतच नाही.
ओशोंच्या तत्वज्ञानातला संभोगच तेवढा पटतो
समाधी अवस्थेत जायचा मार्ग मात्र सापडत नाही
त्या बुद्धाला तरी कसं जमलं
यावर बुद्धी कधीच चालत नाही.
म्हणून आम्ही ठरवतो उघड्या डोळ्यांनी जगावं
आणि अलगदपणे डोळे उघडतो
तेव्हा माणसा-माणसात पेटलेला
स्वार्थी वणवा बघवत नाही
त्यात आम्हीही जळत जातो...
पण त्याचं भस्म मात्र कधीच होत नाही...
डोळ्यांवर पट्टी बांधून जगण्याची
गांधारी इतकी कुवत नाही
पठाणांसारखं लढायला
बंदूक उचलायची ताकद नाही...
वाटतं आत्महत्या करावी
पण इतकेही भेकड आमचे संस्कार नाहीत...
वेदांच्या पठणा इतकच आमचं पांडीत्य नाही
नविन उपनिषदं लिहिणारे
ऋषीमूनी अजूनही आमच्यातूनही गेले नाहीत
बोथट झालेल्या धारा
तिक्ष्ण करण्याचीच तेवढी गरज आहे
सुर्यालाही डोळे मिटायला लावेल
इतका आमच्या अंतरंगात प्रकाश आहे...
डोळे मिटून बघू ...
तेव्हा धगधगणार्या ज्वाला दिसतील
तेव्हा आमचे विचार सखोल असतील...
श्वासाच्या प्रत्येक समिधेत आमची समाधी असेल
तीच निर्विचार निराकार मनःशांती असेल
तेव्हा आमच्यातला प्रत्येक माणूस
विश्वाचा सार्थी असेल
तर कधी मुक्तीचा मार्ग दाखवणारा बुद्ध असेल
पण मनच सालं ते तिथेही द्वंद्व सोडत नाही...
-- प्रवर्तक पाठक
No comments:
Post a Comment