हे ही एक जगणं
म्हणाल तर अर्थ,
म्हणाल तर व्यर्थ..!
अंधारातून प्रकाशाकडे जाणं
सुर्य समजून दिव्याभवती घुटमळणं
पंखातलं बळ निवल्यावर
क्षणात धाडकन कोसळणं!
हे ही असतं एक जगणं...
सेंकंद काट्या प्रमाणे धावत सुटणं
मिनीट काट्या प्रमाणं सावकाश चालणं
तास काट्यावानी निवांत रहाणं
गजरासाठी काट्यांची वाट बघत स्तब्ध होणं!
हे ही असतं एक जगणं
इवलसं अंकूर मायबाप झाडावरून उखडणं
त्याचं वार्यासवे भिरभिरत जाणं
जाता जाता वार्याच्या गतीशी स्पर्धा करणं
हळूच अलगद कुठेतरी खडकात जावून रूजणं!
हे ही असतं एक जगणं...
म्हणाल तर अर्थ म्हणाल तर व्यर्थ...
No comments:
Post a Comment