Sunday, January 03, 2021

का हा अबोला

का हा अबोला मनाचा मनाशी

लोपतो का चांदवा संध्याप्रकाशी?


गिरकीत होतो ना एक दिन-रात

स्तब्ध मी असा उभा क्षितीजापाशी


एकीकडे काळोख पल्याड रंग केशरी

अंधूकसा स्मित किरण तुझ्या ओठांशी


बंदिस्त का व्हावे अनाहूत शब्दांनी?

निःशब्दांच्या झोळीत मथुरा काशी


पाश नात्यांचे गुंतविलेले सप्तर्षींनी

आहे आपले मूळ विश्वाच्या नाळेशी


धावत ये शब्दांच्या स्पंदनी ताफ्यातूनी 

उस्फूर्त उसासे रूणझूणूतात कानाशी...


नको हा अबोला मनाचा मनाशी....


प्रवर्तक

Friday, August 14, 2020

राधा

 सहस्रावधी सप्तरंगी इंद्रधनूं मधून 

कोवळ्या मावळतीच्या किरणांची तिरीप टाकीत

सूर्यही रेंगाळला गं तुझ्या मुग्ध हसण्यावर


तुझ्या श्वासातून उमटणा-या लहरी

भिडत गेल्या अवेगी वादळातून आकाशगंगेत

सृजनतेचा त्याचाच आविष्कार बघून बावरला गं तो...


उसळणा-या लाटा स्तब्ध झाल्या एकाकी

जेव्हा सुस्कारा सोडीत तू एक कटाक्ष टाकलास

वैजयंती माला बांसरी सकट गुणगुणली गं मनात...

Monday, December 16, 2019

आभाळ

गुडूप झालेल्या काळोखात
गडद धुके दाटलेले
चिमणी एवढ्या प्रकाशात 
आभाळ माझे पेटलेले...

उगवत्या रवीला वंदून 
धुके सारे ओथंबले 
धराच्या बाहेर चिऊने
आभाळ चोचीत घेतलेले...


चिऊताई देतेस का तुझे
आभाळ जरासे मजला?
उडालीकी हो भुर्रकन
घिरट्या घालित रानाला...

क्षितिज माझ्या मागावर
मी ही धावत सुटलो
गाठायाला आभाळ जरासे
संधीप्रकाष चिरकाल टिकलेले

Friday, July 05, 2019

भांडण


भांडण
शब्दबंभाळ होत आवेगाने आपण भेटलो होतो तेव्हा -
राग काम क्रोध मत्सर अशा अनेक भावनांचे उसासे 
तूझ्या डोळ्यांच्या खोल डोहांमधून अलवार झीरपत होते;
मी न्हाहालो तूझ्या कणखर कटाक्षात माझ्याच तामसाने!
धमन्यातून उफाळले अवंढ्यात मुद्दामून गिळलेले शब्द!
का सहन करू मी - तूझं प्रत्येक वेळेस करेक्ट असणं?
आणि नंतरचं तूझं ब्रम्हास्त्र  अगणित काळाचा अबोला!”
प्रत्येकदा  मीच माझा अहंकार ठेचून क्षमायाचना करतो;  
इगो गोंजरला जातो म्हणून, की तू क्षमाशील आहेस महणून
तूझ्या मिठीत भांडण मिटतं उज्वल भविष्याच्या आणाभाकांनी!
... पुढच्या भांडणा पर्यंत… ....!!!
- Pravartak Pathak

Thursday, July 05, 2018

ओल्या आठवांचा नभी गुंफला पुंजका
हिरवळ दाटूनी मनी वाहतो निर्मळ झरा...

नटूनी थटूनी निसर्गोत्सव हा साजरा
उल्हासित वारा शिंपडी दवांचा ताटवा..

क्षण स्तब्ध होता काळ चहूदिशा दवडला
पायवाटेवरी तूझा अनाहूत सुंगध दरवळला...

हिरव्यागच्च रानात तूलाही असेच होते का?
मृदगंधी आठवांनी नयनी थेंब ढळतो का?

तूझे माझे जग वेगळे, आभाळ सारखे आहे ना?
उधळत्या सुर्य रथात स्वार होवूनी ये ना...

Monday, October 09, 2017

विनंती वरूणराजाला

नको रे नको रे
असा थैमान घालू
पहील्या सरीच्या
मृदगंध आठवांना
नको रे विरझण लावू

आभाळीच रे बरा तू
नको डोळ्यात येवू
रानात बहरलेल्या
शेतीतल्या रोपट्याचा
नको रे घोट घेवू

भरपूर तू दिलेस आम्हा
नकोसे उसासे घालू
दसरा दिवाळीतल्या
मनमंदीरी दिपज्योतींना
नको रे निर्दयी विझवू

करीन रे प्रतिक्षा पुन्हा
मृग नक्षत्री पुनरागमनाची 
करतो अलविदा
ओल्या काळजाने
नको रे पुन्हा थैमान घालू....

Monday, April 03, 2017

झळा

झळाळलं अवकाश
आगडोंबी सूर्यनारायण
तळपती शूभ्र-किरणे
अच्छादली माथ्यावर

चकाकला थेंब
प्रतिबींब सामावलं
शहारलं माझं शरीर
घाम टिपतो रूमाल

तहान ओठांत-घशात,
आक्रंदते ओटी पोट
उडत होता गरूड,
छाटित गेला ममभान

धस्स झालं काळजात
सावलीच्या शोधात
चैत्रातली पालवी मज
दखवील का वैशाख?

देवा शपथ सांगतो
लावीन एकतरी झाड
टिपाया सूर्य देव
घेइन नांगर हातात

चांदण्याचं आभाळ
परी प्रीय हा पाऊस
ये रं ये रं तू पावसा
सुगंध मातीचा लेवून


  • प्रवर्तक

Monday, January 16, 2017

आठवणी

भुलून सारं सगळं तरी दाटलं आभाळ,
भळ-भळीत आसवं पुसतोस का काळ
गोंदली नक्षी अंतरात, उरी लाटा सळसळं
काही केल्या बूझेना, मनी वणव्याची झळ

आठवांचा योगा-योग सवयींचा गं गुलाम
श्वासा-श्वासात भरतो प्राण होवूनी मोहन
गूंतले नाते मनात, हृदयी काटे मुलायम
धस्स होई काळजात, नीलकंठ प्राणायाम्

दशदिशा उडती काजवे, सैरभैर झाला जीव
आळी-पाळीने गूंजतो, अंतरी राग अहिर-भैरव
तृषित क्षण गावला, मुक्त उधळला मर्मभाव
पूंजका स्वप्नांचा घेवून, करीतो आठवांचा वर्षाव...

Tuesday, April 26, 2016

हितगुज

होते थोडेसेच बोलयचे,
मनी होते हितगुज करायाचे
सून्न झाले मन माझे,
धस्स काळजात शब्द फुकाचे
तीला बघता...

ठाऊक मजला भाव माझे,
अंतरात तिच्या पोहचायाचे
बिलगलो मी तीला कवेत
घेत ती चोरूनीया अंग-अंग
एका क्षणार्धात...

झटकले तीने असे खास,
चांदणे तूटले का नभाचे आज
हातात घेवूनीया हात,
शितल वात बावरा उगाच
चक्क शिषिरात...

साक्षात धावली तीच्या नयनी
गंगा यमूना अन् सरस्वती
न उमजे मजला काहीच
असे चूक मी काय केली
पुन्हा आज...

योग होता दूर्गा-चंडीका
तांडव मजला जमलाच नाही
प्रीत होती तीची नी माझी
भोळी भाबडी असततात नाती
प्रत्येक संसारात...


-    - प्रवर्तक पाठक

Monday, February 08, 2016

प्रतिक्षा...

उडते पाखरू आभाळी,
मन मंदिरी निनादले...
फुलता पिसारा मोरपंखी
नयनी आभाळ बरसले..

शोधले तूला आसमंती
वेडे कोकरू धुंदावले..
डोकाविले डोहात मी
प्रतिबींब तूझे वाहीले...

मृगजळी स्पर्ष तूझा
गगनी कवेत घेतले
उत्कट आस भेटीची
आसवे शब्द थोपीले...

छंद होते कल्पितेचे
घट्ट पाश आळले
सैल जाहले कातळ
हृदयी तव गरजले...

प्रतिक्षेत मी वाटेवरी
उभे विठ्ठला पाहीले
परीसापरी नशिब माझे
अनंतासही न उमगले...


-प्रवर्तक पाठक

Saturday, April 11, 2015

भ्रमर

थेंब ओघळला घळला
तनूवरी शहारा सरसरला
ओठांवरी शब्द गोठला
आठवांचा पसारा ओथंबला

खळखळता किनारा लागला
तो तप्त ढगाआड लाजला
हिरव्या पाचोळ्यात भिजला
सृष्टीचा शृंगार जाहला

खुशाल क्षण दवडला
दवडूनी पुन्हा परतला
मस्तवाल तो असला
काळ मजला गवसला

भ्रमर तो गुणगूणला
दिलात पक्का रुजला
ध्यास आज असला

क्षितीज जग जिकांयला

Thursday, May 03, 2012

स्वप्न...


कधी कधी वाटतं तीच्या बद्दल लिहावं,
भरभरून लिहावं... आवडेल तीला.
विचारांचं काहूर मनात वादळासारखं
थैमान घालतं असतं... सतत...
मनाच्या पटलावरून सहस्त्र बगळ्यांनी उडावं
आणि शांतपणे बघावं त्याकडे..
एक-एक बगळ्यामध्ये
शतकानू शतकाच्या आठवणी दडलेल्या.
त्या आठवणींची पिसं घेवून स्वार व्हावं
अन् पुन्हा एकदा तीला भेटावं...
त्या पहिल्या वहील्या अनोळखी भेटीसारखं.
समूद्रावरून दौडणार्या खार्या वार्याचा
अस्वाद घ्यावा तिच्या चुंबनातून.
धमन्यातून वहाणार्या थेंबा-थेंबात
तीचं अस्तित्व जाणवावं...
खूप बोलावं तीच्याशी...
तीचं सौंदर्य माझ्या डोळ्यातून तीला धाखवावं...
तीच्या डोळ्यात सामावलेला सागरात
डुंबून जावं फक्त तिचं होण्यासाठी...
फक्त तिच्यासाठी.... तल्लीन व्हावं...
एवढंच स्वप्न जगावं प्रत्येक क्षणासाठी...

Wednesday, May 02, 2012

कलाकार


ती होती त्या प्रत्येक क्षणाला
जेव्हा तो तीचं गाणं गुणगूणत होता
जेव्हा तो तीचं आभाळ विणत होता
जेव्हा तो तीला शब्दबंध करत होता

आता ती खरच बंदीस्त झालीये कुठेतरी
तो एकटा वाटसरू या वाटेवरी
तीची गोड गाणी गुणगूणणारा
दुसर्यांच्या आभाळाला ठिगळं लावणारा

खूप लोक असतात त्याच्या सोबतीला
एकलेपणा जीवघेणा वाटतो क्षणा-क्षणाला
अजूनही ती असते त्याच्या सोबतीला
अन् उमटते त्याच्या सृजनतेतून

लोक म्हणतात -
चित्र विक्षिप्त असतात त्याची
गाणी अर्थपूर्ण पण न उमगणारी
कला आहे पण व्यर्थ कलाकारी

काल ती भेटली मला
सांगत होती की,
मी कधी उमगलेच नाही त्याला,
 वेडा तो, ना गवसला कधी स्वतःला...'

Wednesday, April 18, 2012

फकीर

शब्दांची तलवार
गंजली ह्रदयात
जखमा अंतरात
शांतता नजरेत

मुखवटा माझा
दडलेल्या दुःखाचा
शेवंतीवरी जसा
अत्तराचा फवारा

सुर्य-चंद्र होते
होते ग्रह-तारे
जागाच चुकल्या
पोकळीच चोहीकडे

लंपडाव श्वासंचा
खेळ हा भासांचा
ओंजळीतून सांडला
आ़ठवांचा पसारा

प्रतीबिंब माझे
दंशले मलाच
कुठला अपराध
सुखाच्या परीशोधात

न कुठलाच अर्थ
जगण्यातला स्वार्थ
जगतो असा मी
तो फकीर चिंताक्रांत...

Friday, November 25, 2011

ऊन - पाऊस


तीच्या विस्कटलेल्या केसातून हात फिरवावा
अन् आभाळाने चमचमती साद घालावी
लख्ख प्रकाशात तिचा चेहरा चमकावा

मातीचा मृदूगंध श्वासा-श्वासात ठसावा
थेंब थेंब पावसाने मनं चिंब भिजावी
भिजलेल्या स्पर्षाचा जागर रोमरोम उठावा

उन्हाच्या शालीत उबदार स्पर्ष बंधित व्हावा
मौनात तीच्या माझी कविता असावी
अस्फूट शब्दातला अर्थ चराचरात वसावा...

Friday, September 02, 2011

कोहम्


चैत्रातला जागर मी
वैशाखातला विखार मी
बोलणारा वसंत मी
जगणारा श्रावण मी

ऋतूंचे चक्र मी
सागरातला थेंब मी
तार्याभोवतालचे आभाळ मी
पृथ्वीचा गर्भ मी

कल्लोळातला सूर मी
नजरेतला क्षितीज मी
मधातला गंध मी
शब्दातला अर्थ मी

तूझ्यातला तू मी
माझ्यातला तू मी
संभोगातला स्पर्ष मी
समाधीतला मृत्यू मी

गर्भातली भूक मी
डोळ्यातला थेंब मी
हसण्यातला आनंद मी
चराचरात मीच मी