Sunday, June 06, 2010

निरंतरी

आवेग श्वासाचा
मनी स्तब्ध व्हावा
तनू वरी शहारा
क्षणभर सरसरावा

दुभंगल्या स्वप्नांचा
मनी कल्लोळ व्हावा
गगनी एक तारा
पळभरात तुटावा

ममतेच्या पाझराला
असा महापूर यावा
प्रीयजनांचा सहवास
निरंतरी मिळावा..

अलिंगन

डोंगराआडून दिवसाची चाहूल देणार्या
उगवत्या सुर्याला अलिंगन

धुक्यातून वाट काढणार्या
कोवळ्या सुर्याला अलिंगन

रिमझीमत्या पावसात डोकावणार्या
इंद्र-धर्नुधारी सुर्यास अलिंगन

माध्यान्ही अविचल तळपणार्या
धगधगत्या सुर्याला अलिंगन

सागरात क्षितीज स्पर्षणार्या
मावळत्या सुर्याला अलिंगन

अलिंगन....
तुझ्या तेजोवलयात प्रकटण्यासाठी
अन् अखेरीस समर्पण
तूझ्या कणाकणात सामवण्यासाठी...

अर्घ्य

दिवसामागूनी दिवस जाती
आठवणींच्या कळ्या कोमेजती
जगण्यासाठी जन्म आपूला मती
कर्म भावना का असे सोबती?

जन्मास आलो मी एकांती
म्रूत्यू भय मज सोबती
नाजूक क्षणास मन मोहरती
निंद्य मज जीवन जर ना स्वप्नपूर्ती

वाटे, का जन्मलो या जगती
वाटहीन ध्येय्य मज का दिसती?
तारांगणे स्थिर, अस्थीर नाही गती
नियती मात्र जीवाशी खेळती

शरीर मानवी बने पंचमहाभूती
काळ खेळी मन हे एक हाती
कोण मना रे असशी तू सोबती
मुक्ती दे मजला हे अर्घ्य हाती...

एक कविता

कालच्या एका कवितेत
हिरवंगार रान होतं
निळशार आभाळ होतं
झुळझूळणारं पाणी होतं

कालच्या एका कवितेत
मुग्ध संगित होतं
शब्दांनी शहारणं होतं
मन गुणगुणत होतं

कालच्या एका कवितेत
मनस्वी माणसं होती
नात्यांची गिंफण होती
प्रेमाची झुळूक होती

आज मात्र फक्त कविता
आठवणींच्या गर्तेत एकलेपणा
एक आशेचा किरण
अन् एक नवी कविता...

श्वास आणि आठवण

श्वास आणि आठवण
श्वास आणि जाणीव
श्वास आणि स्पर्ष
श्वास आणि तू
मी आणि श्वास
तू अन् मी
अन् फक्त श्वास...