Wednesday, July 13, 2011
मन
मन माझं खळखळलं
आठवणींचा धबधबा होवून
मन चिंब-चिंब भिजलं...
शहारलेल्या जमीनीच्या कुशित
मन माझं शहारलं
शब्दांच्या डोलार्यात डुलून
मन हिरवं गच्च झालं
सैरावैरा धावणार्या वार्यापरी
मन सैरभैर झालं
सोबत तूझी मिळता क्षणी
मन मनात मिळालं
Friday, March 11, 2011
आव्हान
पेटलेला गर्भ माझा
ज्वाळा मुखात आहे
सुर्याला जिंकण्याची आस
मनी धगधगते आहे..
उसळते रग रक्तातली
खळबळ हृदयात आहे
आभाळ कवेत घेण्यास
हात सरसावले आहे...
क्षितीजावरी नजर माझी
विश्वापल्याड दृष्टी आहे
वादळे रोखली किती
आव्हान तूम्हास आहे...
Sunday, February 27, 2011
माझी मराठी
माझीया मराठीत
वसे सूर्याचा अंश
अंधारल्या जगाला
दावीला प्रकाश..
अमृतली मराठी
ज्ञानोबा माउलींनी
लखलखली मराठी
कविवर्य कुसूमाग्रजांनी
तुकोबांनी दिला
जगण्याचा सार
फंदींचे फटके
तलवारीला धार
जग जिंकलीपरी
गर्व ना मनाशी
माझी ही मराठी
जनांच्या ह्रदयाशी...
-प्रवर्तक पाठक.
मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
Sunday, October 10, 2010
आण तूला
तू सहज गेली कशी
भान न उरले मजपाशी
बेभान सैरावैरा धावलो असा
शोध अविरत राहीला कसा
अभास जणू श्वास जसा
तू न भेटली सखी मला
कातर आवाजास कर्ण तरसला
स्पर्षावीन आत्मा हा विखूरला
काळजात वणवा तो पेटीला
गली पूर असा लोटीला
ह्रदयात पत्थर देखील पघळला
आता आस तूझ्या येण्याची
सोबत तूझी तू नसण्याची
आण तूला माझ्या प्रीतीची...
Monday, September 20, 2010
आता पून्हा दंगल होणार
आता पून्हा दंगल होणार
हा पेटणार तो कापणार
धर्म धर्माला ठेचणार
जात जातीला मारणार
आता पुन्हा दंगल होणार
जमाव समोरा समोर ठाकणार
रंग रंगाला नाकारणार
तत्व तत्वांना बोचकणार
आता पुन्हा दंगल होणार
हा लढणार तो जिंकणार
स्त्री-पुरूष बलात्कार करणार
हक्क हक्कांना डावलणार
आता पुन्हा दंगल होणार
Yuan चढणार Dollar पडणार
अन्न-तेल समतोल ढळणार
तंत्र मंत्र महागणार
आता पुन्हा दंगल होणार
व्यक्ती व्यक्त न होणार
विखरणार मनाची लक्तरं
उरणार फक्त जनावर
Saturday, September 18, 2010
अपूरे
आठवतो तीचा हात
तो मखमली स्पर्ष
तीचा कातर आवाज
वाटे ब्रम्ह नाद
तीने घातलेली साद
जन्मोजन्माची वाटली गाठ
तीचा प्रत्येत शब्द
धर्मग्रंथाला न तितूका अर्थ
कर्ण मधूर संगित
ह्रदयास भिडले ह्रदय
मिठीत घेताच तीला
अबोलही वाटले गवन
दंद्वं झाले तिथेच
वासना की अर्थपूर्ण प्रेम
सैल झाले नाते
निरूत्तर राहीले मन...
व्यर्थ्य़
मुलांची शाळा
नवर्याचा व्यवसाय
मोलकरणीचा पसारा
सासूची लगबग
सगळं व्यवस्थीत
सुखी ग्रूहीण जणू
तरी तो आठवतो
वाटे मधूनीच तीला
तेव्हा त्याला साथ
दिली असती तर...
एकदा तरी भेटावं
म्हणूनी घेते शोध...
तो दुनीयेत बदनाम
पैशाने कफल्लक
तर मनाचा श्रीमंत..
कोणासाठी थोर कवी
तर कोणासाठी सल्लागार
व्यवहारात शून्य वाव..
रोजच्या जेवणाची बोंब
आसर्याला शिव्यांची लाखोली..
चड्डी रफू केलेली
तरीही सुखी जगती
क्वचित आठवण तीची
छोट्या जगात होते
भेट जुळवलेल्या योगाची
ती – कसा आहेस
तो – मी मस्त..
एवढाच संवाद जमतो
पाठ घेता फिरवूनी
वाट होते वेगळी...
तो जातो गुत्त्यावरी
ती जाते समूद्रकिनारी
आता ती शांत
समूद्राचा खारा वारा
अंगावर लपेटून घेत
रूमालाने टीपते घाम
मुठीत चिठ्ठी असते
त्याला न दिलेली...
तो तंद्रीत तिच्या
आवंढा गिळतो उगाच
गेले सांगायाचे राहून
जगणे व्यर्थ्य़ तूझ्यावीन...
Sunday, June 06, 2010
निरंतरी
मनी स्तब्ध व्हावा
तनू वरी शहारा
क्षणभर सरसरावा
दुभंगल्या स्वप्नांचा
मनी कल्लोळ व्हावा
गगनी एक तारा
पळभरात तुटावा
ममतेच्या पाझराला
असा महापूर यावा
प्रीयजनांचा सहवास
निरंतरी मिळावा..
अलिंगन
उगवत्या सुर्याला अलिंगन
धुक्यातून वाट काढणार्या
कोवळ्या सुर्याला अलिंगन
रिमझीमत्या पावसात डोकावणार्या
इंद्र-धर्नुधारी सुर्यास अलिंगन
माध्यान्ही अविचल तळपणार्या
धगधगत्या सुर्याला अलिंगन
सागरात क्षितीज स्पर्षणार्या
मावळत्या सुर्याला अलिंगन
अलिंगन....
तुझ्या तेजोवलयात प्रकटण्यासाठी
अन् अखेरीस समर्पण
तूझ्या कणाकणात सामवण्यासाठी...
अर्घ्य
आठवणींच्या कळ्या कोमेजती
जगण्यासाठी जन्म आपूला मती
कर्म भावना का असे सोबती?
जन्मास आलो मी एकांती
म्रूत्यू भय मज सोबती
नाजूक क्षणास मन मोहरती
निंद्य मज जीवन जर ना स्वप्नपूर्ती
वाटे, का जन्मलो या जगती
वाटहीन ध्येय्य मज का दिसती?
तारांगणे स्थिर, अस्थीर नाही गती
नियती मात्र जीवाशी खेळती
शरीर मानवी बने पंचमहाभूती
काळ खेळी मन हे एक हाती
कोण मना रे असशी तू सोबती
मुक्ती दे मजला हे अर्घ्य हाती...
एक कविता
हिरवंगार रान होतं
निळशार आभाळ होतं
झुळझूळणारं पाणी होतं
कालच्या एका कवितेत
मुग्ध संगित होतं
शब्दांनी शहारणं होतं
मन गुणगुणत होतं
कालच्या एका कवितेत
मनस्वी माणसं होती
नात्यांची गिंफण होती
प्रेमाची झुळूक होती
आज मात्र फक्त कविता
आठवणींच्या गर्तेत एकलेपणा
एक आशेचा किरण
अन् एक नवी कविता...
श्वास आणि आठवण
श्वास आणि जाणीव
श्वास आणि स्पर्ष
श्वास आणि तू
मी आणि श्वास
तू अन् मी
अन् फक्त श्वास...
Thursday, June 14, 2007
सोम्यागोम्या
रोजच तात्विकतेच्या चर्चा चालतात
कसली आलीये तात्विकता ?
इथे तर टॉम, डीक आणि हॅरी माज करतात...
लोकं माजोर्डे म्हणून सोम्यागोम्या
दोन पेगात टल्ली होतात
वेटरला टीप द्यायची की नाही
यावर नेहेमीच वाद घालतात...
सोम्यागोम्या रोजच मोठ्याने वाद घालतात
कोणी भांडायला आलं की शेपूट घालून पळतात
सापडतात मग गल्लीतल्या एखाद्या कोपर्यात
दबक्या आवाजात सार्या सिस्टीमचा निषेध करतात...
चार लोकां विषयी मत्सर वाटतो
म्हणून ते गर्दीतही एकटे दुकटेच असतात
चेहेर्यावरले मुखवटे हटू नये म्हणून
ह. भ. प. पेक्षाही भारी बंधूत्वाच्या गप्पा हाणतात
सोम्यागोम्या सतत चोकटी मोडायचा विचार करतात
स्वार्थानुसार क्षणोक्षणी नैतीकतेच्या व्याख्या बदलतात
कोणास ठावूक, का? सोम्यागोम्या फक्त
चौकटीच्याही आतल्या एका वर्तूळातच जगतात
सोम्यागोम्या खूप हळवे असतात
माणसं गेल्यावरच त्यांना त्यांच्या किमती कळतात
स्वतःची किंमत मात्र भलतीच चढवून सांगतात
अन् उधारीच्या तत्वज्ञानावर शेवट पर्यंत जगतात...
सोम्यागोम्या हजारो जन्म घेवूनही अजरामर असतात...
Monday, May 28, 2007
प्रवास
धडधडणार्या छातीचा नाजूक प्रवास!
सरळ रस्ता वळणं फार
नाती थोडी माणसं चिक्कार!
नाही भूक नाही तहान
प्रवासाची गती किती महान!
हा की तो, तो की ती
कोणाचा कोणाशी कसलाच संबंध नाही!
बडबड-गोंधळ धावपळ फार
प्रत्येकाचा मात्र अबोल प्रवास!
भूत-भविष्याचा साखळदंड कमकूवत फार
धडधडत्या छातीचा संपला की प्रवास!
Friday, April 13, 2007
समाधी
कसलेच आभास जाणवत नाहीत
दुरवर कुठे लख्ख प्रकाशही नाही
अन् स्वतःला चाचपडायला काळोख देखील नाही...
कुणाचा आधार घ्यायला हात समोर येत नाहीत
अन् हात आले तर पांगळेपण जाणवत नाही...
मी फक्त चालतो वाटेविना वाळवंटात...
देव - देव करत दगडालाच साकडे घालतो,
विचारतो त्याला - मी कशासाठी जगतो?
तेव्हा एक तांबडा तारा मंद हसतो
मी चिडतो, रुसतो, धुसफुसतो.
ग्लानी येत, वेळ जातो कळत नाही.
एक हलकीच थाप पाठीवर येते
मागे वळून बघतो वार्याची झुळूक असते ...
मी सुखावतो, तांबडा तारा मिष्कील हसतो
डोळ्यातला एक थेंब हातात घेवून
मी धावत सुटतो क्षितीजा पर्यंत...
स्वप्न बघतो - तो थेंब सागराला व्यापतो
तांबडा तरा खदखदून हसतो
मी डोळे फाडून-फाडून बघतो
क्षितीज नसतच का कुठे?
मी हबकतो, क्षणभर थांबतो, मागे वळून बघतो
माझ्याच पाऊलखुणांची दुरवर वाट झालेली दिसते
अन् एक लोंढा त्या वाटेनं सावकाश येतांना दिसतो
तांबडा तारा माथ्यावर स्तब्ध होतो
मी माझ्याच सावलीला पारखा होतो
मी धावत सुटतो वाट नसलेल्या वाळवंटात
लोंढा मला घेरतो, मी निष्प्राण होतो
माझ्या पाउल खुणांचा मात्र महामार्ग होतो
यथावकाश मी ही वाळवंटातलाच एक कण होतो
येणारा जाणारा प्रत्येक लोंढा
माझ्या मातीतल्या कणाला समाधी म्हणतो
तांबडा तारा आता निर्विकार हसतो...
Friday, April 06, 2007
कोकीळा
तळपत्या सुर्याला झिडकारते...
खरं सांग, कोकीळे तू का गाते?
आंब्याच्या मोहराला तू साद घालते
त्याची अविट गोडी मात्र नाकारते
खरं सांग, कोकीळे तू का गाते?
पोटच्या पिलांना दुसर्याच्या घरट्यात वाढवते
स्वतःच्या खोपट्याविना तू जगते
खरं सांग, कोकीळे तू का गाते?
Friday, March 30, 2007
माझीया मनी
सहज उमलती शब्दकळ्या
माझीया मनी गुणगुणल्या
रंगवेड्या पाकोळ्या
तूझ्या आठवणीत
नील आभाळही बरसला
माझीया मनी थयथयला
मोरपंखी पिसारा
तूझ्या आठवणीत
चैत्रही शहारला
माझीया मनी सजला
तूझ्या स्पर्षातला गारवा
-- तूझा प्रवर्तक
Sunday, March 25, 2007
नीशाचर
आभाळमाय ही कोवढी
चंद्राची घनघोर सावली
चांदण्यांच्या मैफीलीत रंगली
धुंद चढली ही सुगंधी माती
अनूभवू दे ही रात्र थोडी
मिट्ट काळोखी गर्द झाडी
सुसाट वारा सनसनाटी
मनालाही मग स्फुर्ती चढली
मंद नयनी निद्रा हरपली
अनूभवू दे ही रात्र थोडी
आज नाचू दे मज स्वच्छंदी
का, उगाच मी हा हर्ष मानसी?
वेड्या वेळ आहे, काळ नाही
फिरव तू कुंचला शब्दांवरी
अनूभवून घे ही रात्र सारी
येईल दिवस रोजच्या प्रहारी
नसतील येथे फक्त तुझेच ठोके
असेल तीच वर्दळ भारी
अनूभवू दे ही रात्र थोडी...
क्षण
जुळणारी - तुटणारी मनं
हसरे - रडवे ओठ
ओले - सुके बोलके डोळे
तरीही अविरत श्वास
आठवणीच शेवटी
अन् रिक्त क्षण...
पून्हा आठवणीच
पंखीया वसले, हळूच सरले
आभाळी भर्रकन भिडले
मन माझीया चिंब झाले
थर-थरवे ओठ घट्ट दबले
नयनी दोन दव डागले
अन् गपकन मिट्ट मिटले
श्वास गच्च रोखले
क्षणात क्षण जिवंत झाले
श्वास वेगानं फुत्कारले
डोळे पापणीतून चकाकले
ओठ मुक्त हसले
मनच ते कसले?
क्षणात मातीस भिडले
क्षणास क्षण क्षणिक उरले...
झुला
मला जवळ करतं
करू दे...
मला सहज टाळतं
टाळू दे...
कोणीतरी कधीतरी
माझ्यावर मनस्वी हसतं
हसू दे...
माझ्यासाठी मुसमुसून रडतं
रडू दे...
कोणीतरी कधीतरी
माझ्यावर खुप रुसतं
रूसू दे...
माझे भरपूर लाड करतं
लाडवू दे...
कोणीतरी कधीतरी बरच काही करत असतं
कधीतरी कोणीतरी मी ही असतो
भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतो
हेच का आपण जगणं जगत असतो?
जगू दे...............